उत्तर प्रदेशसाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. मध्यरात्री झाशीमध्ये रुग्णालयात होरपळून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे सकाळी बिझनौरमध्ये लग्न करून गावी परताना भीषण अपघातात वधू-वरांसह एकचा कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय.
उत्तर प्रदेशमधील बिझनौरमध्ये हरिद्वार-काशीपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हुंडई क्रेटा कारने एका ऑटोला जोरदार धडक दिली. पहाटेच्या धुक्यामुळे कार चालकाला अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बिजनौरच्या तिबरी गावात राहणारा खुर्शीद हा मुलगा विशालच्या लग्नासाठी झारखंडला गेला होता. 14 नोव्हेंबरला लग्न होते. लग्न झाल्यानंतर शुक्रवारी ते कुटुंबासह गावी परतत होते. त्याच्यासोबत विशाल, त्याची पत्नी खुशी, काकू रुबी, काका मुमताज, चुलत बहीण बुशरा आणि इतर दोन कुटुंबीय तिथे होते. या अपघातात खुर्शीद (65), विशाल (25), खुशी (22), मुमताज (45), रुबी (42), बुशरा (10) आणि ऑटोचालक अजब यांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिजनौर जिल्ह्यातील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.