भडगाव | भडगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज शनिवारी सर्वपक्षियांच्या वतीने भडगाव बंदची हाक देण्यात आलीय. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित मुलीच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आलाय.
याबाबत असे कि, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील नऊ वर्षाच्या बालीकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यात लपवल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असली तरी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याला कठोर शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणात उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशा मागण्या करण्यात येत आहेत.
या मागण्यांसाठी काल शुक्रवारी भडगावात भव्य मूक मोर्चासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज भडगाव येथे स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळपासूनच सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. नागरिकांनी या बंदला पाठींबा देऊन या प्रकरणाचा निषेध केला आहे. तर, याच प्रकारे भडगाव तालुक्यातील नगरदेवळा आणि कजगाव येथे देखील आज बंद पाळण्यात येत असल्याचे समजते.
Discussion about this post