जळगाव । जळगाव शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, जळगाव शहरामधील समता नगर येथे रविवारी एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेला सहा तास होत नाही तोवर जैनाबादमध्ये देखील एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
डिगंबर दिनकर सैंदाणे (वय २५, रा. जैनाबाद, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून तो नाश्त्याची हातगाडी लावून उदरनिर्वाह करतो. दरम्यान संध्याकाळी त्याने हातगाडी बंद केल्यानंतर जेवणासाठी मासे घ्यायला जैनाबाद परिसरात गेला होता. तेथे अज्ञात तरुणांशी त्याचा कुठल्यातरी कारणावरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातून अज्ञात तरुणांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवण्याचा गंभीर प्रयत्न केला.
आजूबाजूच्या नागरिकांनी व त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याचेवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहे. दरम्यान दिवसभरातल्या या दुसऱ्या प्राणघातक हल्ल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे.















Discussion about this post