मुंबई । तुळशीचं लग्न आटोपल्यानंतर आता सनई-चौघडे वाजायला सुरुवात होत आहे. त्यामुळं साहजिकच सोन्याची मागणी वाढू लागली आहे. सराफा बाजाराला याचा अंदाज येताच सोन्याच्या भावानं नवा उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर जवळपास ६२,००० रुपयांवर (जीएसटी वगळून) गेला आहे. सोन्याबरोबर चांदीची चमकही वाढली आहे.
२३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर विवाहाचे मुहूर्त आहेत. त्याआधीच सोन्या-चांदीचे भाव वाढू लागले आहेत. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६१,८९५ रुपये होता. आजच्या दिवसातील वाढ ४५८ रुपयांची आहे. तर, चांदीचा भाव किलोमागे ७४,९९३ रुपये झाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नं जाहीर केलेल्या दरांनुसार, सोन्याच्या भावानं आजवरचा उच्चांक नोंदवला आहे. याआधी ५ मे रोजी सोन्याच्या दरानं तोळ्यामागे ६१७३९ रुपये हा उच्चांक नोंदवला होता. त्यात आता १५६ रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएनं जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या दरात जीएसटी आणि दागिने बनवण्याच्या शुल्काचा समावेश नाही. शहरांनुसार, या दरात १ ते २ हजार रुपयांचा फरक असू शकतो.
आयबीजेएच्या दरपत्रकानुसार, सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ५६,६९६ रुपये आहे. तीन टक्के जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा याचा समावेश केल्यानंतर २२ कॅरेटचे एक तोळ्याचे दागिने ६९८४६ रुपयांत पडतील.















Discussion about this post