अकोला : राज्यात सध्या आरक्षणाची लढाई पाहायला मिळत असून ही लढाई ठिकठिकाणी टोकाला जात आहे. अशातच आता अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकाने आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगाव येथे ही घटना घडली असून विजय बोचरे असं आत्महत्या केलेल्याचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे त्यांनी एक पत्र लिहून ते आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवले. त्यामध्ये त्यांनी सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे.
एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यावरून सकल ओबीसी समाजाने देखील आता आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणावरून अकोला जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये’, ‘जातीय जनगणना झाली पाहिजे’ असे पत्रामध्ये नमूद करीत विजय बोचरे यांनी आज पहाटे आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले.
सकाळी ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी चान्नी पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
नेमकं काय आहे व्हॅट्सअप स्टेटसमध्ये पाहूयात..
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य,
विषय : ओबीसी आरक्षणाबाबत
महोदय,
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेटीअरसह घेतलेला निर्णय व काढलेला जीआर यामुळे आज ओबीसी समाजात असुरक्षतेची भावना निर्माण झाली. ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा आहे. आत्ताच मुंबई उच्च न्यायालयाने ओबीसीची याचिका फेटाळली आहे. यामुळे यात आणखी भर पडली आहे. आपण तर म्हणाले होते की आमचा DNA ओबीसीचा आहे. तरी आपण ओबीसी बांधवांना वाऱ्यावर सोडल्यासारखे वाटते. तुम्हाला मुळ ओबीसींना व्यवस्थेत येऊच द्यायचे नाही. अशी माझी खात्री झालेली आहे. आमच्या शिक्षण घेत असलेल्या मुला बाळाचं काही खरं नाही. राजकीयदृष्ट्या सुद्धा मुळ ओबीसींना साध्या सरपंच पदापासूनही दूर राहावे लागेल. वरचे पदे तर आमच्यासाठी लांबच आहेत.
अशाने आमचे जिवन जगून अर्थ नाही. महोदय, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नका, जातीय जनगणना झाली पाहिजे.
आपलाच ओबीसी बांधव
‘विजय बोचरे’.
माझे नातेवाईक समाज बांधव गावकरी बांधव,
राम राम, नमस्कार, जय भिम, सलाम… असा मजूकर व्हॅट्सअपला स्टेटस ठेवत त्यांनी आत्महत्या केली आहे.















Discussion about this post