जळगाव : नोकऱ्यांचे आमिष देऊन होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील एका शेतकऱ्याला मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात सात वर्षांत सुमारे साडेपाच लाख रुपयात फसवणूक केली आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील शेतकरी प्रभाकर सोपान जावळे (वय ५५) यांचा मुलगा कुणाल याला रेल्वेत नोकरीला लावून देण्याचे सांगितले. यात सतीश दिलीप चौधरी), शशिकांत दिलीप चौधरी), धर्मराज भय्या रमेश खैरनार, सरिता पंढरीनाथ कोळी व पंढरीनाथ भागवत कोळी (सर्व रा. चऱ्हार्डी, ता. चोपडा) यांनी वेळोवेळी शेतकरी प्रभाकर जावळे यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन असे एकूण साडेपाच लाख रुपये लाटले.
पैसे घेऊन नोकरी नाही
दरम्यान २०१८ पासून संशयितांनी साडेपाच लाख रुपये घेतले. यानंतर देखील मुलाला नोकरी मिळाली नाही. नोकरी लागत नसल्याने प्रभाकर जावळे यांनी पैसे मागितले असता पैसे देण्यास संशयितांनी नकार दिला. याबाबत शेतकरी प्रभाकर जावळे यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात दाद मागितली. सदर प्रकारची जिल्हा न्यायालयाने तक्रारीची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभाकर जावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.
Discussion about this post