मुंबई । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीला १० पैकी ८ जागांवर घसघशीत यश मिळाले. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला केवळ १ जागेवर मिळाला आहे. यामुळे अजितदादांच्या पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अशातच अजित पवारांना एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमदेवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या मतदारसंघातून तीन पक्षाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किशोर दराडे यांना उमेदवारी दिलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महेंद्र भावसार यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं अपेक्षित असताना झिरवळ यांनी गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत संदीप गुळवे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर झिरवळ यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. सर्व कार्यकर्त्यांनी संदीप गुळवे यांचे काम करावे, अशा सूचनाही झिरवळ यांनी दिल्या आहेत. कौटुंबिक संबंधांमुळे गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे.















Discussion about this post