आगामी लोकसभा निवणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून निवडणुकीत भाजपने ३७० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर “अब की पार एनडीए ४०० पार”, असा नारा देखील दिला आहे. मात्र अशातच लोकसभेपूर्वी भाजपला तगडा झटका बसलाय. हरियाणात भाजप आणि जेजेपीची युती तुटली आहे. त्यामुळे मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
याआधीही राज्यात भाजप आणि जेजेपीची युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी निरीक्षक अर्जुन मुंडा आणि तरुण चुघ हेही चंदीगडला पोहोचणार आहेत.
हरियाणामध्ये ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४० जागांवर विजय मिळवला होता. मात्र, बहुमतापासून भाजपला वंचित राहावं लागलं होतं. अखेर भाजपने १० आमदारांचे संख्याबळ असणार्या दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाबरोबर युती केली.
भाजपकडून मोहनलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र, लोकसभा जागावाटपात दोन्ही पक्षांमध्ये एकमत नव्हतं. हरियाणात लोकसभेच्या १० जागा असून या जागांवर आम्हीच सर्व उमेदवार उभे करणार, असं भाजपच्या वतीने जेजेपीला सांगण्यात आलं.
पण जेजेपीने १० पैकी २ जागांची मागणी भाजपकडे केली होती. पण भाजपने जेजेपीला जागा सोडण्यास नकार दिला होता. यानंतर दुष्यंत चौटाला यांनी थेट दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दिल्लीतही जागावाटपावर समाधान न झाल्याने अखेर चौटाला यांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे हरियाणातील भाजपचे बहुमत कमी झाले. परिणामी मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भाजपचे सरकार कोसळले आहे.















Discussion about this post