कोविड-19 महामारी संपल्याचे चित्र निर्माण होत असतानाच आता एका BA.3.2 या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. ‘सिकाडा’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रकाराचे रुग्ण अमेरिकेसह किमान २२ देशांमध्ये आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हा BA.3.2 प्रकार ओमिक्रॉन परिवारातील एक सब-व्हेरिएंट मानला जात असून सध्या प्रचलित असलेल्या JN.1 प्रकारापेक्षा तो वेगळा असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या म्युटेशनमुळे हा व्हेरिएंट किती वेगाने पसरेल आणि सध्याच्या लसी त्यावर कितपत प्रभावी ठरतील, याबाबत तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास सुरू आहे.
अमेरिकेतील अनेक राज्यांसह युरोपमधील काही देशांमध्येही या व्हेरिएंटची नोंद झाली आहे. दीर्घकाळ शांत राहिल्यानंतर अचानक सक्रिय झाल्यामुळे वैज्ञानिकांनी त्याला ‘सिकाडा’ असे नाव दिले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
लक्षणे, धोका आणि लसींचा प्रभाव :
BA.3.2 या व्हेरिएंटमध्ये 70 ते 75 पेक्षा जास्त म्युटेशन आढळल्याने तो अधिक संसर्गजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे व्हायरोलॉजिस्ट अँड्र्यू पेकोझ यांच्या मते सध्या हा व्हेरिएंट तातडीचा मोठा धोका वाटत नसला तरी तो वेगाने बदलत असल्यामुळे भविष्यात त्याचा परिणाम वाढू शकतो. म्युटेशनची संख्या जास्त असल्याने शरीरातील नैसर्गिक अँटीबॉडीज किंवा लसीमुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती काही प्रमाणात चकवण्याची क्षमता त्याच्यात असू शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे.














Discussion about this post