नवी दिल्ली । विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगाने फॉर्म क्रमांक ६ मधून SIR शी संबंधित घोषणापत्र हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी या निर्णयावरून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निर्णय मागे घ्यावा लागला, यावरून अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. “ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले अनेक निर्णय बदलण्यात आले. हे निर्णय बदलावे लागले तर त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीने परिणाम भोगायला नकोत का? वर्तमानपत्रात बातमी आली नसती आणि लोकांनी राग व्यक्त केला नसता तर काय झाले असते? हे निर्णय बदलले गेले असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत, कारण ते निर्णय समोर आणण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही, असेही दीपके यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये वारंवार बदल होत असल्याने त्याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक सौरभ दास यांनीही या प्रकरणावरून मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे. निर्णयातील चुका मान्य करून माघार घेतली असेल, तर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या निर्णयांसाठी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकांबाबत उत्तरदायित्व निश्चित न झाल्यास संशयाचे वातावरण कायम राहील, असा दावाही सौरभ दास यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाला आणखी धार आली आहे.
लाचखोरीच्या आरोपांचीही चौकशी होणार
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित आणखी एका प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावरील जुन्या लाचखोरीच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
हे प्रकरण सुमारे दोन दशकांपूर्वीचे असून केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी संबंधित आहे. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेल्या ज्ञानेश कुमार यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप एका ठेकेदाराने केला होता. या आरोपांची आता प्राथमिक चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे SIR फॉर्ममधील घोषणापत्र हटवण्यावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित होत असताना दुसरीकडे जुन्या लाचखोरीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याने ज्ञानेश कुमार यांच्याभोवतीची चर्चा पुन्हा एकदा वाढली आहे. मात्र, लाचखोरीचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.














Discussion about this post