जळगाव। तालुक्यातील लोणवाडी येथील तरुणाचा पाय घसरून विहिरीमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. महेंद्र नारायण पाटील (वय २५, रा. लोणवाडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु होते.
महेंद्र नारायण पाटील शेतमजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दि. २९ रोजी दुपारी १ वाजता महेंद्र हा मित्रांसह लोणवाडी ते बांबरुड शिवारात बापू लोटन पाटील याच्या शेतात विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, विहिरीजवळ उभा असताना पाय घसरून पडल्याने तो विहिरीत बुडाला. ग्रामस्थांना समजताच त्यांनी तत्काळ ५ इलेक्ट्रॉनिक पाण्याची मोटार लावून पाणी काढले. व त्याचा शोध सुरु केला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील शिवाजी पाटील तसेच म्हसावद दूरक्षेत्रचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदिप पाटील व स्वप्निल पाटील घटनास्थळी आले. तब्बल ७ तासानंतर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत मिळून आला. त्यानंतर महेंद्र याचा मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु होते. कुटुंबीयांनी यावेळी आक्रोश केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post