धुळे : धुळे तालुक्यातील लोणखेडी गावातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीत ७ वर्षांच्या बालकासह त्याच्या ४ वर्षीय बहिणीचा होरपळून मृत्यू झाला. अमोल नाना पवार (वय ७) आणि रिना नाना पवार (४) अशी मृत भावंडांची नावे आहेत. आपल्या नातवंडांना वाचवण्याचे आजीचे प्रयत्नही निष्फळ ठरले. समोरच नातवंडांचा अंत पाहून आजीने टाहो फोडला. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही.
अमोल आणि रिना हे भाऊ-बहीण खेळत होते. आजी सताबाई या गुरांना पाणी पाजण्यासाठी गेल्या असताना झोपडीला आग लागल्याचे दिसून आले. आगीला पाहताच सताबाई घाबरल्या आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. लोणखेडी (ता. धुळे) गावात नाना पवार हे परिवारासोबत वास्तव्यास होते. शेतीकामासाठी हा परिवार घराबाहेर होता. त्यावेळेस झोपडीत सताबाई यांची आरडाओरडा ऐकून परिसरात क्रिकेट खेळणारी मुले आगीच्या ठिकाणी धावत आली; परंतु आग विझविण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधने नसल्याने झोपडी क्षणार्धात जळून खाक झाली.
आगीमुळे झोपडीच्या जागेवर ढिगारा तयार झाला होता. हा ढिगारा बाजूला केल्यानंतर अमोल आणि रिना या दोघांना बाहेर काढण्यात आले. ते आगीमुळे पूर्णपणे होरपळून काळे पडल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉ. संजयकुमार खिची यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.















Discussion about this post