पुणे । पोलिस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्या प्रकरणी भाजप आमदाराविरुद्ध बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सुनील कांबळे असं गुन्हा दाखल केलेल्या आमदाराचे नाव असून विशेष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे
नेमके काय घडले?
अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी कानशीलात लगावली. पुण्यातील ससून रुग्णालयात हा प्रकार घडला. ससून रुग्णालयात तृतीय पंथीयाच्या स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक आमदार म्हणून आपले नाव नसल्याचे म्हणत आमदार सुनील कांबळे संतप्त झाले आणि त्यांनी सातव यांच्या कानशीलात लगावली. यानंतर सातव यांनी आपण या घटनेची माहिती अजित पवारांना देऊ अस म्हटले आहे. तर उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना कांबळे यांनी त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी शिवाजी सरक यांच्या कानशिलात लगावली होती.
सुनील कांबळे आहेत कोण?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले होते. आमदार होण्यापूर्वी कांबळे 1992 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते. कांबळे यांनी पश्चिम बंगालच्या 2021 च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्याचे भाजपच्या बाजूने काम केले. कांबळे हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जाती विधी समितीचे सदस्य आहेत. भाजपचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.















Discussion about this post