जळगाव : घर बंद करून बाहेर गेलेले असताना हेमंत मार्तंड देशमुख (४५, रा. हायवे दर्शन कॉलनी) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व चांदीच्या देवी-देवतांच्या मूर्ती, भांडे असा एकूण १ लाख २५ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना हायवे दर्शन भागात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत देशमुख यांचे मेडिकल दुकान असून ते २८ डिसेंबर रोजी, रात्री १ ते मंगळवारी २ जानेवारी सकाळी ७:३० वाजेच्यादरम्यान घर बंद करून ते बाहेर गेलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्ती, चांदीचे भांडे चोरून नेले. हा प्रकार मंगळवार, २ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता उघडकीस आला.
याप्रकरणी देशमुख यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपो. निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.
Discussion about this post