जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोड्याचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसत आहे. याच दरम्यान, घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील तब्बल तीन लाख 24 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील द्रोपदीनगरात घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
द्रोपदी नगरातील रहिवासी गणेश विलास निकम हे खाजगी कंपनीत कामाला असून कंपनीच्या कामानिमित्त ते 2 डिसेंबर रोजी अकोला येथे गेले होते. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी मुलाला घेवून धुळे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी निकम यांचे बंद घरफोडून सव्वा तीन लाखाचा ऐवज चोरून नेला.
या घटनेची माहिती शेजारी अजय पाटील यांनी निकम यांना माहिती दिली. निकम यांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधून घरी जाण्यास सांगितले. बुधवार, 13 डिसेंबर रोजी निकम हे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसले. कपाट फोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. टीव्ही, सेटटॉप बॉक्सदेखील चोरट्यांनी लांबविला. कपाटातील दागिने, पैसे चोरीला गेले असून निकम यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल करीत आहेत.