जळगाव/मुंबई । देशभरातून मॉन्सून परतीच्या मार्गावर आहे. अनेक राज्यातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन मान्सूनने निरोप घेतलाय. मान्सून परताच महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली असून जिल्ह्यात उकाडा जाणावत आहे.
ऑक्टोबर हिट आजपासून म्हणजेच १० किंवा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यादरम्यान मुंबईच्या उपनगरातील तापमान हे ३४ ते ३५ डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. तसेच १२ ते १४ ऑक्टोबरमध्ये तापमान थेट ३७ डिग्री सेल्सिअस असणयाची शक्यता आहे. दरम्यान यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीचं वर्तवला होता.
जळगावात ३५ ते ३७ डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला. त्याच दिवसापासून ऑक्टोबर हिटची सुरुवात झाली होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. तापमान वाढल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहारच्या काही भागातून मान्सून माघारी फिरलाय. महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मान्सून परतणार आहे. सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतलाय.















Discussion about this post