मुंबई । डिजिटल व्यवहारांचा वापर वाढला असला, तरी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आजही रोख रकमेची गरज भासते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात ATM चा वापर करतात. मात्र, ATM मधून पैसे काढताना काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ATM आणि दुकानदारांच्या PoS मशीनमधून पैसे काढण्यासंबंधीचे नियम एकत्रित करून २७ नोव्हेंबर रोजी नवीन मास्टर डायरेक्शन जारी केले आहे.
RBI च्या नव्या निर्देशांनुसार, ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहार करता येतील. यामध्ये पैसे काढणे आणि बॅलन्स तपासणे यांसारख्या व्यवहारांचाही समावेश आहे. दुसऱ्या बँकेच्या ATM मधून मेट्रो शहरांमध्ये तीन, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच मोफत व्यवहारांची मर्यादा आहे. मोफत व्यवहारांच्या सध्याच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मोफत व्यवहार संपल्यास २३ रुपये शुल्क
मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी बँक जास्तीत जास्त २३ रुपये आणि लागू कर आकारू शकते. ग्राहकांनी किती मोफत व्यवहार केले आहेत आणि पुढील व्यवहारासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे, याची माहिती बँकांनी देण्याचे निर्देश RBI ने दिले आहेत.
दुसऱ्या बँकेच्या ATM मधून एका वेळी १० हजार रुपये
दुसऱ्या बँकेच्या ATM मधून एका व्यवहारात जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा प्रत्येक व्यवहारासाठी असून संपूर्ण महिन्यासाठी नाही. दरम्यान, ATM मधील तांत्रिक बिघाड, नेटवर्क समस्या किंवा रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास तो मोफत व्यवहारांच्या संख्येत मोजला जाणार नाही. अशा व्यवहारासाठी ग्राहकांकडून शुल्कही आकारले जाणार नाही.
दुकानातील PoS मशीनमधूनही काढता येणार रोख रक्कम
ग्राहकांना दुकानदारांच्या PoS मशीनच्या माध्यमातूनही रोख रक्कम काढण्याची सुविधा आहे. यासाठी एका व्यवहारात जास्तीत जास्त २ हजार रुपये, तर महिन्याला एकूण १० हजार रुपये काढता येतील. या सुविधेसाठी ग्राहकांकडून व्यवहाराच्या रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का शुल्क आकारले जाऊ शकते. विशेष म्हणजे, PoS मशीनमधून पैसे काढण्यासाठी दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करणे बंधनकारक नाही.
त्यामुळे ATM किंवा PoS मशीनचा वापर करताना मोफत व्यवहारांची मर्यादा, अतिरिक्त शुल्क आणि व्यवहार अयशस्वी झाल्यास लागू होणारे नियम जाणून घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post