जळगाव | गेल्या काही दिवसांपासून घसरलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह सोन्याचा भाव १ लाख २९ हजार २६५ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीही किलोमागे ४ हजार रुपयांनी महागली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरवाढीचा सिलसिला कायम असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. विशेषतः लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना वाढत्या किमतींमुळे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. प्रति किलो चांदीच्या भावात ४ हजार रुपयांची वाढ झाल्याने जीएसटीसह चांदीचा दर १ लाख ६० हजार ६८० रुपयांवर पोहोचला आहे. सलग तीन दिवसांच्या दरवाढीमुळे सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींची चर्चा सुरू आहे.
जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीचा परिणाम दरांवर होत असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. जळगाव हे राज्यातील प्रमुख सराफ बाजारपेठांपैकी एक असल्याने येथील दरांमधील चढ-उताराकडे ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष लागले आहे.














Discussion about this post