जळगाव । राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. इतर पक्षांमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ राबवून नेते आपल्या गोटात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला एकही जागा न मिळाल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत डावलल्याने नाराजी?
आमदार चंद्रकांत पाटील यांना स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याची त्यांची तक्रार असल्याचे समजते. पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यातच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांसाठी जागा मागूनही एकही जागा न मिळाल्याने त्यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.
या नाराजीतूनच त्यांनी महायुतीच्या मेळाव्यांना आणि बैठकांना जाणे टाळल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चंद्रकांत पाटील मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात, असा दावा सूत्रांकडून केला जात आहे. ते शिंदे गटाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक आमदाराला एक जागा मिळाली, मात्र चंद्रकांत पाटील यांना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याबाबत त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, निवडणुकीला अजून दोन दिवस बाकी आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे आम्ही करणार आहोत. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही. त्यांना जागा मिळायला हवी होती. त्यामुळे त्यांची नाराजी असणे स्वाभाविक आहे.














Discussion about this post