नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) ने छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील बैलाडिला लोह खनिज खाण, किरंदुल कॉम्प्लेक्स येथे शिकाऊ उमेदवारांच्या 247 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस या पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
NMDCच्या या भरतीमध्ये एकूण 247 जागा असून त्यापैकी 172 पदे ट्रेड अप्रेंटिस, 55 पदे ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि 20 पदे टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस पदांसाठी आहेत. विविध ट्रेड आणि शाखांनुसार ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI किंवा ट्रेड प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी संबंधित विषयातील पूर्णवेळ पदवी आवश्यक आहे. तर टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस पदांसाठी संबंधित शाखेतील पूर्णवेळ डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि पात्रता
शिकाऊ कायदा 1961 नुसार, अधिसूचना जारी झालेल्या तारखेला उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून अप्रेंटिसशिप करार करण्याच्या वेळेपर्यंत पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा.
यापूर्वी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले किंवा सध्या अप्रेंटिसशिप करत असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच संबंधित पात्रता मिळवल्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले किंवा अंतिम परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर न झालेले उमेदवारही अपात्र ठरतील.
मुलाखतीतून निवड
या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाणार आहे. मुलाखती 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण संस्था, B.I.O.M., किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा दंतेवाडा, छत्तीसगड येथे होणार आहेत.
या अप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर NMDCमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची कोणतीही हमी नसल्याचे भरतीच्या अटींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.















Discussion about this post