नवी दिल्ली : पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये नेमके काय आहे, हे ग्राहकांना खरेदीपूर्वी सहज समजावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या खाद्यपदार्थांमध्ये फॅट, साखर किंवा मीठ ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, त्या पदार्थांच्या पाकिटाच्या समोरच्या भागावर लाल रंगाचे षटकोनी वॉर्निंग चिन्ह लावणे बंधनकारक करण्याच्या दिशेने नियम तयार करण्याचे निर्देश कोर्टाने केंद्र सरकार आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाला (FSSAI) दिले आहेत.
न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. FSSAIला या संदर्भातील नवीन नियमांचा मसुदा तयार करून त्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० आठवड्यांनंतर होणार आहे.
तीन घटकांसाठी तीन स्वतंत्र वॉर्निंग
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, एखाद्या खाद्यपदार्थामध्ये फॅट, साखर आणि मीठ यापैकी एक किंवा अधिक घटक निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्याची स्वतंत्र माहिती ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्त फॅट, जास्त साखर आणि जास्त मीठ अशा तीन स्वतंत्र वॉर्निंग चिन्हांची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही चिन्हे लाल रंगाच्या षटकोनी आकारात असावीत. एखाद्या पदार्थात तिन्ही घटक प्रमाणापेक्षा जास्त असतील, तर त्यावर तिन्ही स्वतंत्र चिन्हे लावावी लागतील. एकाच चिन्हामध्ये तिन्ही घटकांची माहिती देऊन चालणार नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वॉर्निंग चिन्ह किती मोठे असावे?
सर्वोच्च न्यायालयाने या वॉर्निंग लेबलच्या आकाराबाबतही महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. प्रत्येक लाल चिन्ह पाकिटाच्या समोरील मुख्य भागाच्या सुमारे ४ ते ५ टक्के आकाराचे असावे, जेणेकरून खरेदी करताना ग्राहकांच्या सहज नजरेस ते पडेल. त्यावरील मजकूरही स्पष्ट, मोठा आणि सामान्य प्रकाशात सहज वाचता येईल, अशा पद्धतीने असावा.
FSSAIला मर्यादा निश्चित करण्याचे निर्देश
खाद्यपदार्थातील एकूण साखर आणि फॅटचे किती प्रमाण धोकादायक मानायचे, याची मर्यादा निश्चित करण्याची जबाबदारी FSSAIवर सोपवण्यात आली आहे. केवळ वरून अतिरिक्त स्वरूपात घातलेली साखर किंवा फॅट न पाहता, पदार्थामध्ये असलेल्या एकूण साखर आणि फॅटचे प्रमाण विचारात घ्यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ही मर्यादा निश्चित करताना वैज्ञानिक माहिती, संशोधन आणि उपलब्ध अभ्यासांचा आधार घ्यावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. मर्यादा खूप कमी ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांवर वॉर्निंग चिन्हे लागतील आणि ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करू शकतात. तर मर्यादा खूप जास्त ठेवल्यास आरोग्यास अपायकारक पदार्थही वॉर्निंगच्या कक्षेबाहेर राहू शकतात, अशी निरीक्षणे न्यायालयाने नोंदवली आहेत.
यासोबतच २०२० च्या अन्न सुरक्षा आणि लेबलिंग नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे पाकिटबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित जोखमीची माहिती अधिक स्पष्टपणे मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post