जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने (कबचौउमवि) पात्र विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
या निर्णयामुळे जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४९ हजार २७९ विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चात मोठा हातभार लागणार असून, विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापैकी ५० टक्के रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
जळगाव व नंदुरबारसाठी ६ कोटींचा निधी वर्ग या शुल्क परतावा प्रक्रियेसाठी जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांना ६ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे.
हमीपत्राची अट रद्द करण्याची अभाविपची मागणी दरम्यान, शासन निर्णयानुसार परीक्षा शुल्क माफ असतानाही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून हमीपत्रे का मागितली जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ही जाचक अट तात्काळ रद्द करावी, तसेच या योजनेचा लाभ केवळ पारंपरिक महाविद्यालयांपुरता मर्यादित न ठेवता शासकीय तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांनाही तातडीने शुल्कमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी केली आहे.














Discussion about this post