नवी दिल्ली : संसदेच्या आगामी अधिवेशनाची तयारी केंद्र सरकारने सुरू केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 15 डिसेंबरपूर्वी अधिवेशनाची तयारी पूर्ण करा आणि या काळात परदेश दौरे टाळा, अशा सूचना पंतप्रधानांनी मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. प्रत्येक मंत्रालयाने अधिवेशनासाठी आवश्यक तयारी पूर्ण ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी अधिवेशनात मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजेच परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकावर सरकार पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, संसदेचे अधिवेशन नेमके कधी सुरू होणार आणि किती दिवस चालणार, याचा अंतिम निर्णय संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीकडून घेतला जाणार आहे.
100 दिवसांहून अधिक काळ अधिवेशनाची प्रतीक्षा
पीटीआयच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आगामी संसदेच्या अधिवेशनाबाबत चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनानंतर 13 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आता 100 दिवसांहून अधिक काळ उलटला आहे. अधिवेशनाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्याने विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. विशेषतः लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनाच्या प्रस्तावामुळे या चर्चेला अधिक महत्त्व आले आहे.
परिसीमन विधेयकासाठी 361 खासदारांचे समर्थन आवश्यक
आगामी अधिवेशनात संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक, 2026 मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाचा संबंध परिसीमन आणि महिला आरक्षणाशी असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेत संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या 540 सदस्यांच्या संख्येनुसार सरकारला किमान 361 खासदारांचा पाठिंबा आवश्यक ठरणार आहे. एनडीएकडे सध्या 320 खासदार असल्याने सरकारला आणखी खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील काही खासदारांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. डीएमकेचे 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ खासदार यांची भूमिका विधेयकाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते.
दरम्यान, संसदेचे अधिवेशन बोलावण्यास होत असलेल्या विलंबावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, हिवाळी किंवा संभाव्य विशेष अधिवेशनाच्या तारखा आतापर्यंत जाहीर व्हायला हव्या होत्या, असे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नेमकी रणनीती काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.















Discussion about this post