पुणे । पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील सत्र न्यायालयाजवळ एका तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. हल्लेखोरांनी आधी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने त्यानंतर कोयत्याने तरुणावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात मंदार मारुती किवळे (३५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, न्यायालयासमोरील रस्त्यावर दुपारी सुमारे १.१५ वाजता हा प्रकार घडला. दोन दुचाकींवरून चार ते पाच हल्लेखोर घटनास्थळी आले. त्यांनी मंदार किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुल मिसफायर झाल्याने गोळी किवळे याला लागली नाही.
यानंतर हल्लेखोरांनी जवळील कोयत्याने किवळे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
वर्षभरापूर्वीच्या खुनाचा बदला?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे वर्षभरापूर्वी झालेल्या एका खुनाचा बदला घेण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. २०२५ मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात शुभम चव्हाण या तरुणाचा मालमत्तेच्या वादातून खून झाला होता. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी चार जणांना अटक केली होती.
शुभम चव्हाण याचा घराशेजारील जमिनीवरून अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद असल्याचे तपासात समोर आले होते. त्यातून चौघांनी लाकडी ओंडके, बांबू आणि स्टंपने मारहाण करून चव्हाण याचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून ताब्यात घेतले होते.
जामिनावर बाहेर येताच हल्ला?
मंदार किवळे हा या खून प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या बाहेर येण्याची माहिती मिळाल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. किवळे हा न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर परिसरातील सत्र न्यायालयाकडे जात असताना आरोपींनी त्याला गाठले आणि हल्ला केला, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.














Discussion about this post