सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) पदांच्या तब्बल १ हजार १६७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी आणि आयटीबीपी या दलांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरु असून, पात्र उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कोणत्या दलात किती जागा?
या भरती प्रक्रियेत एकूण १,१६७ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये आयटीबीपीमध्ये सर्वाधिक ४३० जागा, सीआरपीएफमध्ये ३७७ जागा, बीएसएफमध्ये २३५ जागा आणि एसएसबीमध्ये १२५ जागांचा समावेश आहे.
सीआरपीएफच्या ३७७ जागांपैकी ३४७ जागा पुरुषांसाठी, तर ३० जागा महिलांसाठी राखीव आहेत. बीएसएफच्या २३५ जागांपैकी २२३ जागा पुरुषांसाठी आणि १२ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासकीय गरजेनुसार रिक्त पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित दलात मूलभूत प्रशिक्षणासह किमान चार वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.
बीएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपीमध्ये कॉन्स्टेबल (जीडी), कॉन्स्टेबल (ट्रेड्समन), हेड कॉन्स्टेबल (जीडी) आणि एएसआय (जीडी) या पदांवरील पात्र कर्मचाऱ्यांना अर्ज करता येईल. तर एसएसबीमध्ये एएसआय (जीडी) पदावरील कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षा खुली आहे.
मूळ युनिट किंवा दलाबाहेर प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. उमेदवारांचे मागील पाच वर्षांतील ग्रेडिंग किमान चांगले असणे आवश्यक आहे. नियुक्तीच्या वेळी सेवा नोंद स्वच्छ आणि निर्दोष असणे तसेच उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शेप-१ असणे बंधनकारक आहे. या विभागीय परीक्षेला उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा बसू शकतात.
वयोमर्यादा किती?
या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल ३७ वर्षांपर्यंत वयाची मर्यादा आहे. वयोमर्यादेची गणना ३१ डिसेंबर २०२६ या तारखेनुसार केली जाणार आहे.
अर्ज कसा आणि कुठे कराल?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
१. सर्वप्रथम bsf.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होमपेजवरील ‘Recruitment’ विभागात जाऊन संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
३. आवश्यक माहिती भरून ऑनलाइन नोंदणी पूर्ण करा.
४. अर्जामध्ये सेवा तपशील, रेजिमेंट क्रमांक आणि वैयक्तिक माहिती भरा.
५. आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.
६. भरलेला अर्ज तपासून अंतिम सबमिट करा.
७. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचे पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करून ठेवा.














Discussion about this post