जळगाव: गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेल्या जळगावच्या किमान तापमानात सोमवारी मोठी वाढ नोंदवण्यात आली. पारा एकाच रात्रीत तब्बल ५.२ अंशांनी वधारून १३.२ अंशांवर पोहोचल्याने जळगावकरांना कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून आगामी तीन दिवसांत पारा पुन्हा १० अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तापमानात अचानक वाढ का झाली?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा वेग सध्या मंदावला आहे. तसेच, सोमवारी सकाळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७९ टक्क्यांपर्यंत वाढले होते. वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे आणि आर्द्रता वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी जमिनीतून उष्णता बाहेर पडण्याचा वेग मंदावला. परिणामी, किमान तापमानात अचानक वाढ होऊन ते सरासरीपेक्षा ०.३ अंशांनी अधिक नोंदवले गेले.
पुन्हा हुडहुडी वाढणार
जिल्ह्यात संपूर्ण आठवडाभर आकाश निरभ्र राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. मंगळवारपासून तापमानात पुन्हा टप्प्याटप्प्याने घट होण्यास सुरुवात होईल आणि २६ व २७ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १० अंशांपर्यंत खाली येऊन थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.















Discussion about this post