धुळे : धुळे शहराच्या महापौर माया परदेशी यांच्या प्रकृतीबाबत रविवारी शहरात मोठी खळबळ उडाली. महापौरांनी विषप्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली होती. या घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी रुग्णालयात धाव घेत महापौरांची विचारपूस केली. मात्र, आता या प्रकरणात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर वेगळेच चित्र समोर आले आहे.
महापौर माया परदेशी यांनी विषप्राशन केले नसून औषधांचा ओव्हरडोस घेण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. औषधांचा अतिरिक्त डोस घेतल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेनंतर भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी महापौरांनी विषप्राशन केल्याचा दावा केला होता. त्यामुळे धुळे शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, डॉक्टरांच्या माहितीनंतर विषप्राशनाच्या दाव्यापेक्षा औषधांच्या ओव्हरडोसचे कारण समोर आले आहे.
गोरक्षकाच्या आरोपांनंतर वाद चिघळला
गेल्या काही दिवसांपासून महापौर माया परदेशी या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. धुळे शहरातील गोरक्षक म्हणून ओळखले जाणारे संजय शर्मा यांनी आमदार अनुप अग्रवाल, महापौर माया परदेशी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कत्तलखान्यांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले.
आपली विनाकारण बदनामी केली जात असल्याचा आरोप करत महापौरांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी संजय शर्मा यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे महापौरांच्या दबावामुळे दाखल करण्यात आल्याचा आरोप शर्मा यांनी केला होता. अटकेपूर्वी त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही सांगण्यात येत आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय शर्मा यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर महापौरांच्या मुलासह इतर काही व्यक्तींविरोधातही पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली. या सर्व घडामोडींनंतर महापौर माया परदेशी यांच्या प्रकृतीबाबतची घटना समोर आली आणि राजकीय वातावरण आणखी तापले. मात्र, महापौरांनी विषप्राशन केले नसून औषधांचा ओव्हरडोस झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.सध्या महापौर माया परदेशी यांची प्रकृती स्थिर असून, या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील राजकीय वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post