मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सोमवारच्या सत्राची सुरुवात जोरदार तेजीने झाली. सेन्सेक्सने सुरुवातीलाच 700 हून अधिक अंकांची झेप घेतली, तर निफ्टीनेही 26 हजारांच्या महत्त्वपूर्ण पातळीच्या जवळ मजल मारली. मात्र, ही तेजी अवघ्या काही मिनिटांतच गायब झाली आणि बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली.
बाजार उघडल्यानंतर सुरुवातीच्या अवघ्या 10 मिनिटांतच सेन्सेक्स आणि निफ्टीने दिशा बदलली. सेन्सेक्समध्ये एका टप्प्यावर 650 हून अधिक अंकांची घसरण झाली, तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली. त्यामुळे सुरुवातीच्या तेजीने उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांना काही वेळातच मोठा धक्का बसला.
सोमवारी बीएसई सेन्सेक्स मागील सत्रातील 83,919 अंकांच्या बंद पातळीवरून 84,421 अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने वेगाने वाढ नोंदवत 84,662 अंकांचा उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि सेन्सेक्स घसरत 83,210 अंकांपर्यंत खाली आला.
निफ्टीमध्येही सुरुवातीला तेजीचे वातावरण होते. मागील सत्रात 25,800 अंकांवर बंद झालेला निफ्टी सोमवारी 25,929 अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या खरेदीमुळे तो 25,992 अंकांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्रीचा जोर वाढल्याने निफ्टी 25,567 अंकांपर्यंत घसरला.
जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय बाजारावर परिणाम
भारतीय शेअर बाजारातील या अचानक घसरणीमागे जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत प्रमुख कारण ठरले. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगमधील बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही जाणवला.
विशेषतः जपानच्या निक्केई निर्देशांकात 3,000 हून अधिक अंकांची घसरण झाली. निक्केईमध्ये 5 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकातही जवळपास 1 टक्क्याची घसरण झाली. तर दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांकात सुमारे 160 अंकांची म्हणजेच 3.20 टक्क्यांची घसरण झाली.
दरम्यान, बाजार सुरू होण्यापूर्वी गिफ्ट निफ्टीमध्ये सुमारे 150 अंकांची वाढ दिसत असल्याने भारतीय बाजारातही सकारात्मक सुरुवातीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात बाजाराची सुरुवात तेजीने झालीदेखील; मात्र जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि वाढलेल्या विक्रीच्या दबावामुळे ही तेजी फार काळ टिकली नाही.
जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात ‘तेजीपासून घसरणीपर्यंत’ असा मोठा उलटफेर पाहायला मिळाला.















Discussion about this post