जळगाव । लग्नाचे आश्वासन देत २४ वर्षीय तरुणीला भडगाव येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोपीने तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील २४ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. याचदरम्यान तिची नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी रोहीळे येथील मनोहर देवराम खोटरे याच्याशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर जवळिकीमध्ये झाल्यानंतर आरोपीने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीने तरुणीला भडगाव शहरातील पाचोरा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
घटनेनंतर आरोपीने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले तसेच व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या धमकीमुळे काही काळ तरुणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, अखेर तिने धैर्य दाखवत १९ नोव्हेंबर रोजी भडगाव पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली.
बीएनएसच्या कलमांनुसार गुन्हा पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी मनोहर देवराम खोटरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा क्रमांक ३८३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
घटनेच्या तपासादरम्यान तांत्रिक पुरावे संकलित करण्यासाठी पोलिसांकडून ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश बाळासाहेब टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप पाटील करीत आहेत.















Discussion about this post