जळगाव : जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जामनेर तालुक्यातील गोद्री शिवारातील कांग नदीकाठ आणि डालकी धरण परिसरात फत्तेपूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २०) पहाटे छापे टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ हजार लिटर कच्चे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले, तर ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार फत्तेपूर पोलिसांना गोद्री परिसरात गावठी दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान गूळ आणि नवसागराचे मिश्रण असलेले सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांच्या हाती लागले. त्याची अंदाजे किंमत १ लाख रुपये होती. हे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. यासोबतच विक्रीसाठी तयार ठेवलेली सुमारे ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.
चौघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे
या कारवाईत जाबीर हसन तडवी, फकिरा रमेश तडवी आणि हजराबाई युनुस तडवी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (फ) अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिघांकडून अनुक्रमे ४००, २०० आणि ४०० लिटर कच्चे रसायन आढळून आले. त्याची एकूण किंमत सुमारे १ लाख रुपये असून ते पोलिसांनी नष्ट केले. तर रहेमान कासम तडवी याच्याविरुद्ध कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन, सफौ प्रविण चौधरी, पोलीस हवालदार भूषण पाटील, चेतन तांगडे, सुमित पाटील, पांडुरंग सुरवसे आणि महिला पोलीस कर्मचारी अर्चना पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.















Discussion about this post