सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत इंजिनिअर ट्रेनी पदांच्या एकूण ३१९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर सायन्स शाखेतील उमेदवारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, GATE 2026 परीक्षेच्या गुणांच्या आधारे या पदांसाठी निवड केली जाणार आहे.
या भरतीअंतर्गत इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) पदाच्या २५० जागा, इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) पदाच्या ४८ जागा आणि इंजिनिअर ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स) पदाच्या २१ जागा भरल्या जाणार आहेत. अशा एकूण ३१९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) पदासाठी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल (पॉवर), इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टिम्स इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) या शाखांमधील बीई, बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग पदवीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच GATE 2026 परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बीई, बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग पदवीमध्ये किमान ६० टक्के गुण आणि GATE 2026 ची पात्रता आवश्यक आहे.
तर इंजिनिअर ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स) पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी शाखेतील बीई, बीटेक अथवा बीएससी इंजिनिअरिंग पदवीमध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. या पदासाठीही GATE 2026 परीक्षा आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२५ रोजी २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे.
त्यामुळे पात्र इंजिनिअरिंग पदवीधरांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटींची खात्री करून घ्यावी.















Discussion about this post