नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारमधील काही मंत्र्यांबाबत केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारमधील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात असून, पुढील आठ महिन्यांत त्याचे परिणाम दिसून येतील, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, शिकागो विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. यावेळी त्यांनी भाजपच्या अंतर्गत संघटनात्मक रचनेवरही भाष्य केले. भाजपची अंतर्गत व्यवस्था कमकुवत होत असल्याचा दावा करत काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार, हे नेते सरकारमधील घडामोडींची माहिती विरोधकांना देत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या विधानानंतर ‘भाजपचे हे मंत्री नेमके कोण?’ याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगावरही निशाणा
याच संवादादरम्यान राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी दबावाला कंटाळले असून ते विरोधी पक्षांना आतली माहिती देत असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप करताना राहुल गांधी यांनी विरोधक निवडणुकांवर बहिष्कार टाकणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकांवर बहिष्कार टाकल्यास लोकशाहीची रचना आणखी कमकुवत होईल, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, त्यांना निवडणूक आयोगाच्या आतूनही माहिती मिळत आहे. संबंधित अधिकारी आता ही व्यवस्था पुढे चालवणे कठीण असल्याचे सांगत असल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांमुळे आगामी काळात भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post