जळगाव । लग्नसोहळ्यातील वादातून तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली. लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणानंतर एका अज्ञात हल्लेखोराने २३ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृताचे नाव असून, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली.
प्रेम धनगर हा अमळनेर येथे राहत होता. त्याचे आई-वडील बोरनार येथे वास्तव्यास असल्याने तो दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. बुधवारी सायंकाळी गावातील एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी तो गेला होता. यावेळी त्याचा काही व्यक्तींसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने प्रेम याच्यावर धारदार चाकूने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, धनगर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशामुळे वातावरण शोकाकुल झाले.
दरम्यान, प्रेम धनगर याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, लग्नसोहळ्यात त्याचा नेमका कोणासोबत वाद झाला आणि त्याच्या हत्येमागील कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत गावातील नागरिकांकडून ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
एमआयडीसी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. लग्नसमारंभासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या रक्तरंजित घटनेने बोरनार गाव हादरले आहे.















Discussion about this post