मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या विलिनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने लवकरच विलिनीकरणाची घोषणा होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चेला स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
‘अजितदादा गेल्यावर विलिनीकरणाच्या चर्चा संपल्या. विलिनीकरणाला आमच्याकडून आता फूलस्टॉप,’ असे स्पष्ट विधान सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच, शरद पवार एनडीएसोबत जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात रोज तर्क-वितर्क सुरू असतात. राजकीय पक्ष असल्यामुळे चर्चा होत असतात. अजितदादा असताना विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्या होत्या. विलिनीकरणाची तारीखही ठरली होती. मात्र, अजितदादा गेल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा संपल्या.’
पुढे बोलताना त्यांनी या विषयावर नाराजीही व्यक्त केली. ‘ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपला. माझा भाऊ राहिला नाही, आता कसली चर्चा करत आहात? विलिनीकरणाला आमच्याकडून फूलस्टॉप. यापुढे विलिनीकरणावर उत्तर देणार नाही. यावर बोलण्याचा मला आता कंटाळा आला आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
अजित पवार गटाकडून आपल्याला विलिनीकरणाबाबत कोणताही फोन, मेसेज किंवा पत्र आलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘राज्यात दुष्काळाचा विषय गंभीर आहे. त्याकडे लक्ष द्या. देशासमोर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावर बोला,’ असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबाबतही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. या बैठका लोकांच्या कामासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ‘सत्ता येते आणि सत्ता जाते, मात्र नाती कायम टिकतात,’ अशी भूमिका मांडली. भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध असून, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत काम केले आहे. वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी सन्मानाने बोलणे हे आपले संस्कार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post