अहिल्यानगर । दिवाळीच्या सणासाठी घराघरांत आनंदाची तयारी सुरू असतानाच आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरजगावजवळील बाभळगाव येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पडोळे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात दोन ज्येष्ठ व्यक्तींसह अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. सुदाम मारुती पडोळे (वय ५५), देविदास मारुती पडोळे (वय ५५) आणि श्रेया विशाल पडोळे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने केळसांगवीसह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळसांगवी येथील पडोळे कुटुंबातील सदस्य कापूस विक्रीसाठी मिरजगावजवळील बाभळगाव येथील जिनिंगवर गेले होते. कापूस विकल्यानंतर शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ते मोटारसायकलवरून घरी परतत होते. याचवेळी मोटारसायकल आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारने दुचाकीला तब्बल ३०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला.
दिवाळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना पडोळे कुटुंबावर काळाने घाला घातला. घरात सणाची तयारी सुरू होती. कापूस विकून मिळणाऱ्या पैशांतून दिवाळीची खरेदी करण्याचे नियोजन होते. मात्र, घरी परतण्याच्या प्रवासातच काळाने झडप घातल्याने एका कुटुंबातील तिघांचे आयुष्य संपले. ज्या घरात दिवाळीचा उत्साह असायला हवा होता, तिथे आता शोक आणि आक्रोशाचे वातावरण आहे.
या घटनेतील दहा वर्षांच्या श्रेयाची कहाणी ऐकून प्रत्येकाचे मन हेलावून जात आहे. नुकतेच वडिलांचे छत्र हरवलेल्या श्रेयाने दिवाळीसाठी आजोबांकडे नवे कपडे आणि फटाक्यांचा हट्ट धरला होता. “आजोबा, मला दिवाळीला नवे कपडे घ्या ना… नवे कपडे आणि फटाके पाहिजेत,” अशी तिची निरागस मागणी होती. शेतातील कापूस विकून मिळणाऱ्या पैशांतून आजोबा नातीला नवे कपडे घेणार होते. मात्र, नियतीच्या क्रूर घावाने तिचे दिवाळीचे स्वप्न कायमचे अपुरे राहिले. ज्या आजोबांकडून तिला दिवाळीच्या भेटीची अपेक्षा होती, त्यांच्यासह तिचाही या अपघातात मृत्यू झाला.
अपघातानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन मिरजगाव येथे करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. दिवाळीच्या मंगलमय पर्वावर पडोळे कुटुंबातील तिघांचा झालेला हा दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला सुन्न करणारा ठरला आहे.














Discussion about this post