जळगाव : अजित पवार यांच्यासारखा सोन्यासारखा माणूस बोलता बोलता निघून गेला. अवघा अर्धा मिनिट चुकला आणि महाराष्ट्राचे किती मोठे नुकसान झाले, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. अजितदादांचा आणि माझा पक्ष वेगवेगळा असला, तरी माणूस म्हणून ते मला खूप आवडायचे, असेही त्यांनी सांगितले. जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीदरम्यान आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, दादांना काय कमी होते? ते ५० हजार कोटींचे मालक होते. त्यांच्याकडे सत्ता होती, अधिकार होते आणि वाटेल ते काम करण्याची क्षमता होती. सकाळी साडेसहा वाजता टेबलावर बसून कामाला सुरुवात करणारा हा नेता होता. मात्र, शेवटी देवाने त्यांना नेले. जे होणार आहे, ते कोणीही टाळू शकत नाही, असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
राजकारणातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना पाटील म्हणाले की, आता राजकीय पक्षांमध्येही काही ठाम राहिलेले नाही. दर चार महिन्यांनी कोण कोणत्या पक्षात आहे, हे विचारावे लागते. त्यामुळे आपण जे होणार आहे ते स्वीकारून आनंदी राहतो. अजितदादांचा पक्ष वेगळा असला, तरी त्यांच्यातील माणूस मला आवडत होता. राजकीय मतभेद असले तरी चांगल्या माणसाचे आणि त्याच्या कामाचे कौतुक केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आर. आर. आबांच्या कामाचेही केले कौतुक
यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्याचाही गुलाबराव पाटील यांनी आवर्जून उल्लेख केला. आर. आर. आबा कोणत्या पक्षाचे होते, याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही. मात्र, त्यांनी घेतलेले चांगले निर्णय मान्य केलेच पाहिजेत. झोपडीत राहणाऱ्या आणि वाड्या-वस्त्यांवरील मुलांनाही पोलीस होण्याची संधी मिळाली, याचे श्रेय द्यायचे झाले तर ते केवळ आर. आर. आबांना जाते, असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्वही अधोरेखित केले. मंत्री असण्याबरोबरच मी एक माणूस आहे. माणसाने माणसाला मदत करावी, ही शिकवण बाबासाहेबांनी दिली आहे. बाबासाहेब नसते, तर माझ्यासारखा ओबीसी समाजातील माणूस मंत्री झाला नसता, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘बारिश ना होती तो खेती ना होती, बाबासाहेब ना होते तो समता ना होती,’ असे म्हणत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.














Discussion about this post