जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर काही ठिकाणी मतभेद आणि कुरघोडी झाल्याचे चित्र असले, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे मैदानात उतरावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसह विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी नेहमीच्या मिश्किल आणि ग्रामीण शैलीत राजकीय टोलेबाजीही केली.
नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष एकत्र आले, तर काही ठिकाणी परस्परविरोधात लढल्याचे गुलाबराव पाटील यांनी मान्य केले. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी ठेवण्यासाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी ‘आधी आय लव यू तर म्हणू द्या’ असा मिश्किल टोला लगावत महायुतीतील संभाव्य एकजुटीचे संकेत दिले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अंतिम आणि योग्य निर्णय वरिष्ठ नेते गिरीश महाजन घेतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या अर्ज बाद होण्यामागे ‘अदृश्य शक्ती’ असल्याचा आरोपही करण्यात आला होता.याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी शेजारी बसलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे पाहत मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘तीच अदृश्य शक्ती आता सुमित पाटलांना नक्की मदत करेल,’ अशी टिप्पणी करत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
नाशिकमधील कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबतही गुलाबराव पाटील यांनी भूमिका मांडली.जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रकार गंभीर असून, अशा प्रवृत्तींना कोणाचेही समर्थन असता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी एरंडोल परिसरातही अशाच प्रकारे जबरदस्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा अभिमान असला पाहिजे; मात्र कोणावरही दबाव टाकून धर्म बदलण्यास भाग पाडणे महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या सातत्यपूर्ण टीकेवरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. राऊत इतरांवर सातत्याने आरोप करत असतात; मात्र त्यांनी स्वतः तुरुंगवास भोगला असल्याचे सांगत गुलाबरावांनी त्यांच्यावर निशाणा साधला.‘संजय राऊत यांना १०० दिवसांत जामीन मिळाला, तर त्यालाही क्लीन चिटच समजायचे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शरद पवारांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.शरद पवार हे देशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारून त्यांनी पूर्णपणे बरे व्हावे, यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.















Discussion about this post