रेल्वेमध्ये प्रशिक्षणाची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती कक्ष, मध्य रेल्वेयांनी शिकाऊ उमेदवारांच्या तब्बल २ हजार ८६१ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या पाच क्लस्टरमध्ये ही भरती केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना २ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
ही भरती शिकाऊ उमेदवार कायदा, १९६१ अंतर्गत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
विभागनिहाय पदसंख्या
या भरतीमध्ये मुंबई क्लस्टरसाठी सर्वाधिक १ हजार ७१२ पदे आहेत. त्यानंतर भुसावळ विभागासाठी ५००, पुण्यासाठी २७१, नागपूरसाठी २२१, तर सोलापूर क्लस्टरसाठी १५७ पदे उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी किंवा समकक्ष परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. यासोबत संबंधित ट्रेडमधील NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
केवळ १० वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. तसेच अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका धारक उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. यापूर्वी शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवारही अपात्र ठरतील.
वयोमर्यादा
३ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सवलत मिळणार आहे.
दरमहा ९,६०० रुपये विद्यावेतन
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण दिले जाणार असून, या कालावधीत दरमहा ९ हजार ६०० रुपये विद्यावेतन मिळणार आहे. हे विद्यावेतन असून, त्याला नियमित रेल्वे कर्मचाऱ्याचा पगार मानले जाणार नाही.
प्रशिक्षणासाठी रेल्वेकडून वसतिगृह किंवा निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करार करावा लागेल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांच्या करारावर पालकांची स्वाक्षरी आवश्यक असेल. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची कोणतीही हमी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. मात्र SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. अर्ज शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI किंवा वॉलेटच्या माध्यमातून भरता येणार आहे.
एकदा भरलेले अर्ज शुल्क परत केले जाणार नाही. खात्यातून पैसे वजा झाले, मात्र अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर पुन्हा पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटवरील ‘Verify Payment’ पर्यायातून पेमेंटची स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भुसावळसह पाच क्लस्टरमध्ये मोठी संधी
मध्य रेल्वेच्या या भरतीमध्ये मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या पाच क्लस्टरचा समावेश आहे. विशेष म्हणजे भुसावळ क्लस्टरसाठी ५०० जागा उपलब्ध असल्याने उत्तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post