जळगाव । दिवाळीत मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी असते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सने जळगावात पाठवण्यात आलेला तब्बल २४० किलो संशयित बनावट खवा प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून जप्त केला आहे. बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असून, या कारवाईमुळे जळगावच्या बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
दिवाळीच्या काळात बाजारात खव्याची मागणी कैक पटींनी वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा खवा जळगावमध्ये आणला जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकाने तात्काळ पावले उचलत शहरातील ‘श्री बालाजी ट्रॅव्हल्स’च्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. ट्रॅव्हल्समधून उतरवण्यात आलेल्या साठ्याची तातडीने पाहणी केली असता, त्यात २४० किलो संशयित खवा आढळून आला. पथकाने हा संपूर्ण साठा जप्त करत तात्काळ पंचनाम्याची कारवाई पूर्ण केली.
जप्त करण्यात आलेल्या खव्याचे नमुने पथकाने ताब्यात घेतले असून, ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर हा खवा नेमका भेसळयुक्त वा बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधितांवर ‘अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये’ (FSSAI) अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, गुजरातवरून आलेला हा संशयित खव्याचा साठा नेमका कोणत्या स्थानिक व्यापारी किंवा मिठाई विक्रेत्याने मागवला होता, याचा कसून शोध सध्या FDA कडून घेतला जात असून, या प्रकरणातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आणखी काही जणांचे बिंग फुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post