जळगाव,| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत राज्यातील ४.८७ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर ४,७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ९७६ शेतकऱ्यांना ४५.७० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. बँकांनी योजना पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय संस्करण केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार याद्यांद्वारे एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आतापर्यंत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आज ४.८७ लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत असून, यामुळे आज अखेर एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यात जिल्ह्यातील ६ हजार ९७६ शेतकऱ्यांचा सामावेश आहे.















Discussion about this post