जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे अधिकृत चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी महायुतीमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप सुरू असतानाच, तीन जागांवर बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला गेला आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. या अनपेक्षित घडामोडीने जळगावच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या सोसायटी मतदारसंघांतील उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या तिन्ही जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील, तर भुसावळ मतदारसंघातून रजनी संजय सावकारे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे, नलिनी पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री, तर मृणाल पाटील या त्यांच्या पत्नी आहेत. रजनी सावकारे या मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी आहेत.
या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांचे प्रतिनिधित्व चर्चेत आले आहे. दरम्यान, महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच तीन जागांवर बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित मतदारसंघांतील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post