जळगाव । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून खाजगी वायरमन योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश उर्फ भैय्या वाघ हे नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. पिंप्राळा परिसरातील एका घरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत ते गंभीररीत्या बाधित झाले. त्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भैय्या वाघ हे शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि शिवसैनिकांनी रुग्णालयात गर्दी केली. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेल्या भैय्या वाघ यांच्या मृत्यूची बातमी दुपारी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
या दुर्दैवी घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पिंप्राळा परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.















Discussion about this post