मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी तब्बल २३ तासांनंतरही सुरूच असून, अद्याप अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. पुणे, मराठवाडा, नागपूर आणि अमरावती या मतदारसंघांतील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, काही मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, तर काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार पुढे आहेत. पसंतीक्रमानुसार मतमोजणी होत असल्याने अंतिम निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडे यांची आघाडी
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. या मतदारसंघात १९ उमेदवार बाद फेरीत बाहेर पडले आहेत. गावडे यांच्या विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा २५ हजार ७५६ इतका निश्चित करण्यात आला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपचे कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ६०० मते मिळाली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना ११ हजार ३२८, राष्ट्रीय समाज पक्षाचे दत्तात्रय सावंत यांना १० हजार ३७७, तर काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना ८ हजार ३५० मते मिळाली आहेत. या मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीवर
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा जाधव आघाडीवर असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. त्यांना १ लाख १२ हजार ४०० मते मिळाली आहेत, तर भाजपच्या स्मित जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली आहेत. या मतदारसंघात विजयासाठी १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, हर्षदा जाधव यांना विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी आणखी काही मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे उर्वरित मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची आघाडी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर त्यांना ७८ हजार ५४० मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ५५ हजार १८० मते मिळाली आहेत. याशिवाय रविराज साबळे यांना २० हजार ४७०, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ३६६ मते मिळाली आहेत.
या मतदारसंघात विजयासाठी ८९ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी मिळाली असली, तरी अंतिम निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता कायम आहे.
नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे पुढे
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी दुसऱ्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. त्यांना ६० हजार ९२४ मते मिळाली असून, काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ५६ हजार ६३० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना २४ हजार २४९ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सुधाकर कोहळे हे ४ हजार २९४ मतांनी आघाडीवर आहेत. पुढील मतमोजणीत ही आघाडी कायम राहते की निकालाचे चित्र बदलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक आघाडीवर
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातही मतमोजणीचा थरार कायम आहे. १९ व्या बाद फेरीअखेर १६ उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी आघाडी कायम ठेवली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, किरण सरनाईक यांना ८ हजार ३४८ मते मिळाली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ४ हजार ८१३, तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना ४ हजार ७८६ मते मिळाली आहेत.
या मतदारसंघात विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. सरनाईक यांना हा कोटा गाठण्यासाठी आणखी मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील मतमोजणीत कोणाला किती मते मिळतात, यावर अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे.
अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
विधानपरिषदेच्या या पाच जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत विविध मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारांनी बाजी मारण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
पसंतीक्रमानुसार मतमोजणी आणि विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघांतील अंतिम निकाल काय लागतो आणि कोणत्या पक्षाचे पारडे जड ठरते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post