जळगाव । जळगाव शहराच्या बाहेरील पाळधी-तरसोद बायपासवर अपघातांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेश यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. काम संपवून दुचाकीने घरी परतत असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच जखमी योगेश यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. संसाराची नव्याने सुरुवात केलेल्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आसोदा पुलाच्या दुर्घटनेनंतर वाहतुकीचा प्रश्न
३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव खचल्याने बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. यामुळे पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण वाढला असून, अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर २५ अपघात झाले असून, त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे बायपासवरील वाहतूक व्यवस्थापन आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
आयशर चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
या अपघातानंतर पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. बायपासवरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, वाहतुकीचे नियोजन, वाहनांचा वेग नियंत्रित करणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.















Discussion about this post