जळगाव : पाळधी-तरसोद बायपासवर शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. पाळधी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना रस्त्यासह पुलाच्या भरावाचा मोठा भाग खचून कोसळला. यामुळे कामासाठी वापरण्यात येणारी अवजड क्रेन खाली कोसळली. या दुर्घटनेत क्रेनचालक मधुकर धनराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या अडीच महिन्यांत या बायपासवर दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पाळधीकडून तरसोदच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू होते. याचदरम्यान अचानक रस्त्याचा आणि पुलाच्या भरावाचा मोठा भाग खचला. त्यामुळे पुलावर असलेल्या अवजड क्रेनचा तोल जाऊन ती थेट खाली कोसळली. दुर्घटनेचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या अपघातात क्रेनचालक मधुकर पाटील यांना प्राण गमवावे लागले.
यापूर्वी याच बायपासवरील तरसोदकडून पाळधीकडे जाणाऱ्या मार्गावर आसोदा गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूचा भराव खचून वाहून गेला होता. त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आता पाळधीजवळ दुसरी दुर्घटना घडली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे उड्डाणपुलांच्या बांधकामाचा दर्जा, देखभाल आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या महामार्गावर वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पुलाच्या भरावाची गुणवत्ता, बांधकामातील संभाव्य त्रुटी आणि दुरुस्तीच्या कामादरम्यान घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच, दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे.
प्रशासनाकडून कारवाईचे आदेश
ही दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले. मात्र, घटनेनंतर सुमारे पाच तास उलटूनही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचला नसल्याची माहिती समोर आली. यामुळे बचावकार्य आणि प्रशासकीय समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित झाले. पाळधी-तरसोद बायपासवरील सलग दुर्घटनांमुळे महामार्गाच्या बांधकामाची स्वतंत्र चौकशी करून सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याची मागणी जोर धरत आहे. या दुर्घटनेला नेमकी कोणती कारणे कारणीभूत ठरली, याचा तपास झाल्यानंतरच त्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.














Discussion about this post