ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नवरात्रीनिमित्त शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव ट्रकने अनेक भाविकांना चिरडल्याची भीषण घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून, ३९ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधिकारी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, छिनोरहून शीतला माता मंदिराकडे जाणारा रस्ता उताराचा असून, या मार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी एका ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि उतारावरून वेगाने पुढे जात मंदिराच्या बाहेरील भिंतीला व प्रवेशद्वाराला धडक दिली. त्यानंतर रस्त्यावरून मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना ट्रकने चिरडले.
१३ जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरू
अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिका आणि इतर मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. एकूण ३९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी १३ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून, अनेकांच्या हाडांना दुखापत झाली आहे. कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. संबंधित ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि वाहन तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) पथकही तैनात होते. मात्र, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक बॅरिकेड्स तोडून पुढे गेला आणि भीषण दुर्घटना घडली. नवरात्रीच्या काळात मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर ओढवलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.














Discussion about this post