जळगाव : यंदा राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, परतीचा पाऊसही पुरेसा न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशातच राज्यातील काही भागांत पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील हवामानाची स्थिती आणि पावसाचा नेमका अंदाज याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर, सांगली, धुळे, मालेगाव, नाशिक आणि कोकणातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागांत वादळी पाऊस झाल्याचे चित्र आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांनंतर काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
२२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही भागांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मुंबई आणि परिसरातही ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष हवामानाकडे
जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाच्या तुटीमुळे शेती आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज असल्याने जळगाव जिल्ह्यातही पाऊस होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. .१८ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरात कमाल तापमान सुमारे ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून, आकाश अंशतः ढगाळ राहू शकते. उपलब्ध हवामान अंदाजानुसार, १९ आणि २० ऑक्टोबर रोजीदेखील तापमान ३६ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि पाऊस झाला. ऐन दुष्काळात झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला; मात्र काढणीस तयार असलेल्या पिकांचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली.
दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्यावर भर दिला जात आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याने उन्हाळी सिंचनाच्या आवर्तनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कालव्यातून यंदा उन्हाळी आवर्तन दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एकीकडे पावसाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे पाणीसाठा जपण्याचे आव्हान, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाने हजेरी लावली असली, तरी जळगावसह दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यांना या पावसाचा कितपत फायदा होतो, हे आगामी हवामानावर अवलंबून राहणार आहे.















Discussion about this post