नशिराबाद । नशिराबाद शहरातील ताजनगर परिसरात हातात उघडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला नशिराबाद पोलिसांनी वेळीच शिताफीने जेरबंद केले आहे. १६ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली असून, आरोपीकडून ३३ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गावातील ताजनगर परिसरात एक तरुण हातात उघडी तलवार फिरवत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरवत आहे. या माहितीची गंभीर दखल घेत सपोनि नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने पंचांसह ताजनगर परिसरात सापळा रचला.
यादरम्यान वर्णनाशी जुळणारा एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला जागीच ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शेख अल्ताफ शेख रऊफ (वय २८, रा. ख्वाजा गरीब नगर, नशिराबाद) असल्याचे सांगितले.
पोलीस कारवाई व जप्ती
पोलिसांनीझडती घेतली असता त्याच्याकडून मूठ असलेली, जुनी वापरती सुमारे ३३ इंच लांबीची लोखंडी तलवार मिळून आली. या जप्त केलेल्या तलवारीची अंदाजे किंमत १,१०० रुपये आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष ही तलवार हस्तगत केली असून, आरोपी शेख अल्ताफ याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.















Discussion about this post