मुंबई । राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील पशुपालकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या अटी शिथिल केल्या आहेत. यामुळे चारा टंचाईवर मात करण्यासाठी वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी गटांना अतिरिक्त चारा बियाणे आणि ठोंबे वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही सवलत सन २०२६-२७ या वर्षासाठी लागू राहणार आहे.
या योजनेच्या ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ही अट चालू वर्षासाठी शिथिल केली आहे. त्यामुळे पात्रतेच्या नव्या सवलतीचा लाभ अधिक पशुपालकांना घेता येणार आहे.
वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार रुपयांचे चारा बियाणे
योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर चार हजार रुपये किमतीचे चारा बियाणे दिले जाते. चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यास आणि प्रथमच लाभ मागणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्यास, संबंधित लाभार्थ्यांना एकापेक्षा अधिक वेळा लाभ देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंत अनुदान
शेतकरी समूह किंवा गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर २० हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. या गटांकडे चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा असल्यास आणि प्रथमच लाभ मागणाऱ्या अर्जदारांची मागणी पूर्ण झाल्यानंतर, उपलब्धतेनुसार अतिरिक्त बियाणे वाटप करता येणार आहे.
पाणीसाठ्याची खातरजमा आवश्यक
सर्वसाधारणपणे ही योजना वर्षातून एकदाच राबविली जाते. मात्र, यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त लाभ देण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी चारा उत्पादनाकरिता पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. संबंधित उपायुक्त पशुसंवर्धन यांनी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे प्रमाणित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच, प्रथमच योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्याची खात्री करूनच अतिरिक्त लाभाचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा व विभागीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
योजनेच्या अटी, पात्रता आणि लाभाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.दुष्काळामुळे चारा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला असताना, चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील पशुपालकांना आपल्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.















Discussion about this post