जळगाव । जळगाव शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. महापालिकेकडे कचरा संकलनाचा मक्ता असलेल्या बीव्हीजी (BVG) कंपनीचे सुमारे २० कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याचे सांगितले जात असून, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने सुरू झालेले कामबंद आंदोलन अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू असताना, आजही शहरातील अनेक भागांत घंटागाड्या आलेल्या नसल्याचे समजते. त्यामुळे घरांबाहेर आणि रस्त्यांच्या कडेला कचरा साचत असून, जळगावकरांना कचराकोंडीचा सामना करावा लागत आहे.
पगार थकल्याने चालकांचे कामबंद आंदोलन
जळगाव शहरातील घराघरांतून कचरा संकलन करण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. या कामासाठी घंटागाड्या, कॉम्पॅक्टर, पिकअप आणि ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मात्र, वाहनचालकांचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यातून बुधवारी सकाळपासून चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले.गुरुवारीही वेतनाचा प्रश्न सुटला नसल्याने आंदोलन सुरूच राहिले. त्याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला. आता आजही अनेक भागांत घंटागाड्या न आल्याचे समजत असल्याने नागरिकांची अडचण कायम आहे. कचरा नेण्यासाठी नियमित घंटागाड्या येत नसल्याने नागरिकांना कचरा घराबाहेर साठवून ठेवावा लागत आहे.
दोन दिवसांत ३५० टनांहून अधिक कचरा साचल्याची माहिती
कचरा संकलन ठप्प झाल्यामुळे दोन दिवसांत शहरात ३५० टनांहून अधिक कचरा साचल्याची माहिती समोर आली होती. रस्त्यांच्या कडेला, घरांबाहेर आणि विविध परिसरांत कचऱ्याचे ढीग जमा झाल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आजही घंटागाड्या न आल्याने परिस्थिती पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.कचरा वेळेवर उचलला गेला नाही, तर परिसरातील अस्वच्छता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपाचा तिढा लवकर सुटून कचरा संकलन नियमित सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बीव्हीजी कंपनीचे महापालिकेकडे सुमारे २० कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याचे सांगितले जात आहे. बिल थकल्याने कंपनीच्या कामकाजावर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाल्याची माहिती आहे. मात्र, या आर्थिक प्रश्नाचा थेट फटका शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बसत आहे. महापालिका प्रशासन आणि बीव्हीजी कंपनी यांच्यात या प्रश्नावर तोडगा कधी निघणार, कर्मचाऱ्यांचे वेतन कधी मिळणार आणि शहरातील घंटागाड्या नियमित कधी सुरू होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. संप कायम राहिल्यास जळगावकरांना आणखी काही काळ कचराकोंडीचा त्रास सहन करावा लागू शकतो.















Discussion about this post